Wed Oct 02 16:05:56 UTC 2024: ## महालक्ष्मी मंदिरात १० दिवसांचा भव्य नवरात्र उत्सव, सोन्याची साडी देवीला परिधान करण्यात येईल
**पुणे -** श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक आणि सांस्कृतिक ट्रस्टच्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवाचा प्रारंभ गुरुवारी (दि. ३) पासून होत आहे. या दिवसापासून ते १२ ऑक्टोबरपर्यंत धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा सन्मान केला जाईल अशी माहिती ट्रस्टच्या विश्वस्त आणि उत्सवप्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल यांनी दिली. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, अमिता अग्रवाल, अॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते.
गुरुवारी सकाळी ८:०० वाजता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. सायंकाळी ६:०० वाजता मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते होईल. दहा दिवसांत श्री सुक्त अभिषेक, श्री विष्णू सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये आयोजित करण्यात आले आहेत. सर्व धार्मिक कार्यक्रमांचे पौरोहित्य मिलिंद राहुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली होतील.
उत्सवात ढोल-ताशा वादनसेवा, पुणे मनपा महिला कर्मचारी सन्मान, नामांकित कंपन्यांमधील महिला एचआर यांचा सन्मान, महिला न्यायाधिशांचा सत्कार, लेखिका-कवयित्री सन्मान, पुणे मनपा स्वच्छता कर्मचारी सत्कार, कन्यापूजन, विविध शाळांतील शिक्षकांद्वारे भोंडला, वीरमाता-वीरपत्नी सन्मान, नारी तू नारायणी सन्मान सोहळा असे विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत.
सांस्कृतिक उपक्रमांमध्ये शिव-पार्वती विवाह सोहळा, कथकली नृत्य, छत्रपती शिवाजी महाराजांवरील नाट्य आणि पोवाडा सादरीकरण, सामूहिक गरबा आणि प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रम यांचा समावेश आहे. दसऱ्याला श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात येणार आहे.
भाविकांचा ५ कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आली असून, मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरात ५० सीसीटिव्ही कॅमेरे आणि २५ हून अधिक सुरक्षारक्षक तैनात केले जातील.