Sat Oct 05 15:36:47 UTC 2024: ## राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन कुर्मीची हत्या, भायखळा पोलीस करीत आहेत तपास
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) भायखळा विधानसभा तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी ऊर्फ मुन्ना (४५) यांची शुक्रवारी मध्यरात्री हत्या करण्यात आली. दोन ते तीन अज्ञात संशयितांनी धारदार हत्याराने त्यांचा खून केल्याचा संशय आहे. याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भायखळा येथील रेतीवाला इंजस्ट्रीज समोरील अनंत पवार मार्गावर जखमी अवस्थेत कुर्मी पडलेले असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानुसार काळाचौकी पोलीस ठाण्याच्या मोबाइल व्हॅनला घटनास्थळी पाठवण्यात आले. कुर्मी यांना तात्काळ जे.जे. रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मानेवर, हातावर, पोटावर व छातीवर गंभीर जखमा असल्याचे आढळून आले.
म्हाडा कॉलनीच्या मागच्या बाजूला हा हल्ला घडला. एका पादचाऱ्याने घटनेची माहिती देण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी केला होता. हा हल्ला का करण्यात आला त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस याबाबतीत अधिक तपास करीत आहेत.